गावकारभाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या विकासकामांचा आदर्श घ्यावा : संदीप शेळके; धामणगाव बढे येथे ईदमिलन कार्यक्रम उत्साहात...

 
धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गत दहा वर्षांपासून सिंदखेडची धुरा सांभाळणाऱ्या प्रवीण कदम यांनी ग्रामविकासाचा ध्यास घेतला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना हर्षवर्धन सपकाळ यांनी वकाना गावात विकासाचे मॉडेल उभे केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कदम यांनी लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा कायापालट केला. गावकारभाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस नेते संदीप शेळके यांनी केले.
 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सिंदखेडचे प्रशासक प्रवीण कदम यांच्यावतीने ९ एप्रिल रोजी आयोजित सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर गणेश पाटील, मिलिंद जैस्वाल, तुळशीराम नाईक, इरफान पठाण, सुनील पाटील, साहेबराब डोंगरे, रवी महाजन, शेरूभाऊ, किसन खराटे, सुकलाल पाटील, एकनाथ शेवाळे, अलीम कुरेशी, अमर कुळे, जाकीर कुरेशी, रफिक सेठ, दिवाकर बोराळे, सुभाष प्रधान, मुक्तारभाई, पवन जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले,  ​प्रवीण कदम यांनी पद मिळवणे हा उद्देश कधीच ठेवला नाही. केलेल्या कामांमुळे त्यांना पदे मिळाली. सिंदखेडचे सरपंच म्हणून त्यांनी राबवलेल्या योजनांची शासनाने दखल घेतली. सरपंच कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळाले आहे. गावात शंभर टक्के तुषार सिंचन आहे. स्मशानभूमी सौदर्यीकरण, दर्जेदार रस्ते, नालेसफाई, जलजीवन योजनेतून मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. कदम यांचे कार्य  कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार संदीप शेळके यांनी काढले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. सर्वधर्मीय ईदमिलन कार्यक्रमातून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला मोताळा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचालन प्रा. गणेश हुडेकर यांनी केले.

भगीरथ कामांवर पुरस्कारांचे कोंदण 

प्रवीण कदम यांच्या भगीरथ प्रयत्नांतून सिंदखेडला विविध पुरस्कार मिळाले आहेत. जलसंधारणच्या कामाची दखल घेऊन सन २०१८ मध्ये पाणी फाऊंडेशनचा २५ लाखांचा पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये शासनाचा ५० लाखांचा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात १३ लाखांचा विभागीय पुरस्कार मिळाला आहे. सिंदखेडने वृक्षलागवडीसाठी माझी वसुंधरा अभियानात दोन वेळा ५० लाखांचा विभागीय आणि एक वेळ ७५ लाखांचा राज्यात द्वितीय पुरस्कार पटकावला आहे. राज्यातील आदर्श गावे हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, पाटोदा यासह राजस्थानमधील पिंपलात्री गावास त्यांनी भेट दिल्या आहेत. तेथील चांगल्या योजना आपल्या गावात राबवण्यासाठी कदम यांचा सातत्याने प्रयत्न राहिला असल्याचे शेळके म्हणाले.