सीईओंच्या दालनाबाहेर उर्दू शाळेचा क्लास; सात वर्षांपासून इंग्रजी-गणित शिक्षक नाहीत; किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाअभावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान..!
सीईओंच्या दालनातच भरवला वर्ग
२० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर बाक, वही, पुस्तके घेऊन त्यांनी थेट शाळाच भरवली. या वेळी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला –
“आमच्या भविष्यासाठी कोणी जबाबदार आहे? सात वर्षांपासून शिक्षक नाहीत. दहावीची परीक्षा कशी देणार?”
जि.प. उर्दू हायस्कूल, किन्होळा येथील शालेय व्यवस्थापन समितीने १८ जुलै रोजीही अर्ज सादर केला होता. समितीने सीईओंना दिलेल्या लेखी निवेदनात मागणी केली आहे की, इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता भाषा (इंग्रजी) विषयासाठी १ शिक्षक, इयत्ता ७ वी ते १० वीकरिता संपूर्ण विषयांसाठी ३ शिक्षक
तत्काळ नियुक्त करण्यात यावेत. शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पटसंख्याही घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शिक्षक विभागाने यापूर्वी या शाळेला गणित आणि विज्ञान विषयाकरिता एका शिक्षकाची डेप्युटेशनवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ती तात्पुरती असल्याने आता पुन्हा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.