दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; पीकविमा अन् हेक्टरी १ लाख मदतीसाठी शेतकऱ्यांचे विहिरीत उतरून आंदोलन!
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.
तसेच सन २०२४ चा उर्वरित पीकविमा आणि सन २०२५-२६ चा सरसकट पीकविमा शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पीककर्ज वाटप करताना बँकांकडून लावण्यात येणारे किचकट नियम बदलून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच विनाकारण त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, दरम्यान, ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट विहिरीत उतरून आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाचे आणि सरकारचे याकडे लक्ष वेधले गेले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.