केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश; पेनटाकळी प्रकल्पाच्या पाझरामुळे नुकसान झालेल्या उर्वरीत १०९ शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई!
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत झाला महत्त्वपूर्ण निर्णय..!
Aug 6, 2025, 19:04 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेनटाकळी प्रकल्पातील पाणी पाझरामुळे नुकसान झालेल्या, परंतु अहवाल यादीतून वगळण्यात आलेल्या तब्बल १०९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विदर्भ पाटबंधारे नियामक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी तातडीने संबंधित विभागाचे लक्ष वेधून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते.जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालवा कि.मी. ० ते ११ दरम्यानच्या भागात २००३ ते २०२० या कालावधीत सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाणी पाझरामुळे या कालव्यालगतच्या पेनटाकळी, दुधा, रायपूर, सोनारगव्हाण, सावत्रा, टाकरखेड व पांचला या सात गावांतील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली होती, परंतु १०९ शेतकरी त्यातून वगळले गेले होते. या संदर्भात पुन्हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक आणि जलसंपदा विभागाचे अभियंते यांनी संयुक्तपणे क्षेत्राची पाहणी करून ६६.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे निष्पन्न केले. याचे पंचनामे करून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास नियामक मंडळाने मान्यता दिली असून, बाधित शेतकऱ्यांना एकूण ८६लाख ४८ हजार २३५ इतकी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. यापूर्वी मौजे दुधा व रायपूर शिवारात झालेल्या पाझरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे ₹५.३९ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये जवळपास ९८ टक्के खातेदारांना मोबदला वितरित करण्यात आला होता.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उर्वरित वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्यामुळेच या नव्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे