केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर !अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी, आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा!
गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे;पंचनाम्याचे चावडी वाचन करा, प्रशासनाला दिले निर्देश..!
Sep 29, 2025, 18:57 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पाडळी, नळकुंड, उबाळखेड आणि गुळभेली या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करतांना केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे . नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीने सामोरे गेले पाहिजे. आपत्तीग्रस्त भागांतील गावकऱ्यांनी गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना पंचनाम्यासाठी सहकार्य करुन योग्य पद्धतीने नुकसानीची पंचनाम्ये करून घ्यावेत. या पंचनाम्याचे चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना केले.
या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, तहसिलदार अजितराव जंगम, ओमसिग राजपूत, धनंजय बारोटे, रामदास चौथंकर, अनुजा सावळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.