उद्या रक्तदानाचा महायज्ञ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मेरा खुर्द येथे रक्तदान शिबिर; जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; रक्तदान करून समाजकार्यात योगदान देण्याचे आवाहन...

 
मेरा खुर्द (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या २२ जुलैला वाढदिवस आहे. त्यानिमित्त साखरखेर्डा मंडळ भाजपच्या वतीने मेरा खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा आहे. अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सामाजिक संवेदनशीलता दाखवत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, पोस्टरबाजी करू नका अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्याऐवजी सेवेचे उपक्रम राबवण्याचे आवाहन प्रदेश भाजपने केले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून उद्या २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मेरा खुर्द येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्यामुळे कुणालातरी उद्याचा सूर्य पाहता येईल...

  एक थेंब रक्ताचा... कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो.अनेक रुग्ण रुग्णालयात जीवनमरणाच्या सीमारेषेवर झुंज देत असतात. अपघात, शस्त्रक्रिया, कॅन्सर, थॅलेसेमिया, गरोदर महिलांचे अतिरक्तस्राव असे अनेक प्रसंग असतात, जेव्हा रक्ताशिवाय आयुष्य अशक्य होतं. अशा वेळी, तुमच्या रक्ताच्या थेंबांनी कुणाचा जीव वाचू शकतो. रक्तदान ही केवळ सेवा नाही, ती एक मानवतेची पुकार आहे.हे दान तुम्हाला गरीब करत नाही, उलट तुम्ही कोणासाठी तरी देवदूत ठरता. कृपया पुढे या…आपला हात पुढे करा…रक्तदान करा…आणि कोणाचं तरी उद्याचं सूर्य पाहणं शक्य करून द्या...