उमरा - अटाळी शिवारात वाघाची दहशत! बैल, वानर फस्त; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..!
Sep 12, 2025, 10:58 IST
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील उमरा - अटाळी, विहीगाव व किन्ही महादेव शिवारात वाघाच्या हालचाली सुरू असून त्याने जनावरांवर हल्ले करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघाने या परिसरात धुमाकूळ घालत जनावरांवर हल्ले सुरू केले आहेत. उमरा - अटाळी येथील शेतकरी रामा चव्हाण यांचा एक बैल वाघाने ठार केला आहे. त्याचबरोबर वाघाने वानरांवरही हल्ला करून त्यांना ठार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने या वाघाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.