‘वाहने जप्त करू, जामीन मिळणार नाही’ची धमकी; वनपाल पोटेंनी शेतकऱ्याकडून १.७५ लाख घेतल्याचा आरोप! दोन लाखांची मागणी केल्याचा दावा;
काही दिवसांपूर्वी वनपाल गजानन पोटे शेतात आले असता, सदर गोठा वन विभागाच्या जमिनीच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी वाहने ताब्यात घेण्याची, कारवाई करण्याची आणि जामीन मिळणेही कठीण होईल, अशा स्वरूपाच्या धमक्या देऊन आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा दावा परिहार यांनी तक्रारीत केला आहे.
दोन लाखांची मागणी; १.७५ लाखांवर व्यवहार झाल्याचा दावा
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी रक्कम कमी करण्याची विनंती केली. मात्र कारवाईची भीती कायम असल्याने अखेर १ लाख ७५ हजार रुपये देण्यास आपण तयार झालो, असा दावा त्यांनी केला आहे. वनपाल गजानन पोटे यांच्या सांगण्यावरून ही रक्कम संबंधित व्यक्तीच्या घरी नेऊन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार परिहार यांनी स्पष्ट केले आहे की, ही रक्कम त्यांनी स्वेच्छेने किंवा कोणत्याही वैयक्तिक व्यवहारापोटी दिलेली नसून कारवाई व वाहने जप्त होण्याच्या भीतीमुळे आणि मानसिक दबावाखाली दिल्याचा त्यांचा आरोप आहे.रक्कम दिल्यानंतर वनपाल गजानन पोटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, ‘आता काळजी करण्याचे कारण नाही, तुझ्यावर काहीही होणार नाही, तू निश्चिंत राहा’, अशा आशयाचे संभाषण झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.तसेच हा प्रकार गावात कोणाला सांगू नये, अशा स्वरूपाचेही बोलणे झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा सागर परिहार यांनी केला आहे. संबंधित आर्थिक व्यवहाराबाबत झालेल्या अन्य संभाषणांचेही रेकॉर्डिंग उपलब्ध असून, चौकशी अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास सर्व पुरावे सादर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकारानंतर आपण वनपाल गजानन पोटे यांच्याकडे केवळ ‘माझ्याकडून पैसे घेतले आहेत की नाही, एवढे स्पष्ट सांगा’, अशी विचारणा केली होती. आपण कोणत्याही अधिकाऱ्याला धमकी दिलेली नसल्याचे परिहार यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.मात्र आपली तक्रार दडपण्यासाठी आणि आपल्यावर दबाव आणण्यासाठी उलट आपल्याविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपल्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल झाली असल्यास तिचीही निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ऑडिओ रेकॉर्डिंग तपासा; पैसे परत मिळवून द्या
वनपाल गजानन पोटे यांच्यावरील आरोपांची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, २ लाख रुपयांची मागणी आणि प्रत्यक्ष दिलेल्या १ लाख ७५ हजार रुपयांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, तसेच आपल्याकडील ऑडिओ रेकॉर्डिंग व इतर पुरावे तपासण्यात यावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. आपल्याकडून घेतलेले १ लाख ७५ हजार रुपये परत मिळवून द्यावेत आणि चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ACBकडे प्रकरण पाठविण्याची मागणी
या प्रकरणात लाच मागणी अथवा स्वीकाराचा प्रकार प्रथमदर्शनी आढळल्यास हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नियमानुसार पाठविण्यात यावे, अशी मागणीही सागर परिहार यांनी केली आहे.या तक्रारीच्या प्रती वरिष्ठ वन अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, वनपाल गजानन पोटे यांच्यावरील हे आरोप तक्रारदाराने केलेले असून, त्यांची अद्याप स्वतंत्र चौकशीत पुष्टी झालेली नाही. या आरोपांबाबत वनपाल पोटे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा पोटे यांनी केला आहे..