स्वतःच्या गावात त्यांची लायकी नाही, राजीनामा द्यावा! आ. गायकवाड यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना टोमणा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत आ. संजय गायकवाड यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पूजाताई गायकवाड मोठ्या फरकाने नगराध्यक्ष पदी निवडून आले आहेत. शिवाय ३० पैकी तब्बल २२ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. बुलढाणा नगरपालिकेत काँग्रेसचे केवळ २ नगरसेवक निवडून आलेत..आता या विजयानंतर आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना टोमणा मारला आहे. "यांना नगरसेवक निवडून आणता येत नाही, स्वतःच्या गावात यांची लायकी नाही, आता नैतिकता म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा" असा हल्लाबोल आ.गायकवाड यांनी केला आहे.
 बुलडाणा हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होम ग्राउंड आहे. इथे ते आमदार देखील राहून गेलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना बुलढाणा नगरपरिषद जिंकता येते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. बुलढाण्यात सपकाळ यांनी महाविकास आघाडीची एकजूट बांधत लढा दिला, मात्र त्यांचे केवळ २ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मी काकस यांचा ४ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड यांनी एकूण मतदानाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते घेतली. भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे  तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या...