विहिरीत मुबलक पाणी, तरी पिके वाळली! १५ गावांचा शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्रावर ठिय्या; महावितरणविरोधात संतापाचा उद्रेक...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चांगला पाऊस झाल्याने विहिरींमध्ये मुबलक पाणी... मात्र शेतीपंपाला वीज नसल्याने डोळ्यादेखत खरीप पिके सुकत असल्याने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचा अखेर संयम सुटला. मंगरूळ नवघरे येथील ३३/११ केव्ही महावितरण उपकेंद्रावर १५ गावांतील शेतकऱ्यांनी आज सकाळी ८ वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. वीजपुरवठा सुरळीत करून शेतीपंपांना नियमित वीज द्या, अन्यथा महावितरण कार्यालय सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड-मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव खुर्द, नायगाव बुद्रुक, पेनसावंगी, सावरखेड, उत्रदा-दहिगाव शिवार, डोंगरगाव यासह परिसरातील गावांचा शेतीपंपाचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे. मात्र वीजपुरवठाच नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिके माना टाकू लागली आहेत.

या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र दुपारी १ वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला."महावितरणला वीजबिल वसुलीची घाई असते; मात्र शेतीला वीज देण्याची वेळ आली की दुर्लक्ष केले जाते. विहिरीत पाणी असूनही केवळ वीज नसल्यामुळे पिके सुकताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे," असा संतप्त सूर आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

- मंगरूळ नवघरे उपकेंद्रांतर्गत १५ गावांचा खंडित कृषी वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा.
- दिवसा सलग ८ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा.
- वारंवार बिघाड होणाऱ्या रोहित्रांची व वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

लेखी आश्वासन आणि प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू झाल्याशिवाय उपकेंद्र सोडणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मागण्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात ८ ते १० गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.