बोरखेडा-मोताळा बसमध्ये ‘जागा’ नाही, विद्यार्थ्यांची फरफट सुरू! पास काढूनही ऑटोचा खर्च; तरोड्यानंतर कोथळीत विद्यार्थ्यांना बसमध्ये चढायलाही मिळेना, प्रशासनाला अपघाताची वाट पाहायची आहे का?
पास काढला, पण बसमध्ये जागाच नाही; विद्यार्थ्यांवर ऑटोचे पैसे भरण्याची वेळ!
या मार्गावरील बससेवेवर परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी मोताळा शहरात ये-जा करतात. तर नागरिक रुग्णालयीन उपचार, शासकीय कार्यालयातील कामे आणि इतर आवश्यक कामांसाठी मोताळ्याकडे प्रवास करतात. मात्र सकाळच्या फेरीत प्रवाशांची संख्या मोठी असताना बसची क्षमता अपुरी पडत आहे.विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी एसटीचा पास काढलेला आहे. मात्र पास असूनही बसमध्ये चढण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी जागा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजाने खासगी ऑटोचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बसचा पास काढण्यासाठी पैसे खर्च करूनही शाळेत पोहोचण्यासाठी पुन्हा ऑटोचे भाडे मोजावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
तरोड्यात गर्दी, तर कोथळीत बसमध्ये चढायलाही जागा नाही!
बोरखेडा येथून निघालेली बस तरोडा येथे पोहोचेपर्यंतच प्रवाशांनी खच्चून भरलेली असते. त्यामुळे त्यानंतरच्या गावांतील प्रवाशांसाठी परिस्थिती आणखी बिकट होते. कोथळी येथील विद्यार्थ्यांना अनेकदा बसमध्ये चढण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.मग या विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे तरी कसे? त्यांच्यासाठी स्वतंत्र बसफेरीची व्यवस्था करायची नाही, आणि उपलब्ध बसमध्ये चढायलाही जागा द्यायची नाही, तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी रोज खासगी वाहनांचा खर्च करायचा का? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांचाही जीव मुठीत घेऊन प्रवास!
ही समस्या केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही. याच बसमधून रुग्णालयात जाणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये असल्याने गर्दीतून प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.गर्दीमुळे एखादा विद्यार्थी बसमधून पडला, एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडली किंवा ज्येष्ठ नागरिकाला काही अनुचित घडले, तर त्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल प्रवासी आणि ग्रामस्थांकडून केला जात आहे.
अतिरिक्त फेरीची मागणी वारंवार; तरीही प्रशासन ‘झोपेत’च!
बोरखेडा-मोताळा मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अतिरिक्त बसफेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप होत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांकडून बस पासचे पैसे घेतले जातात; दुसरीकडे बसमध्ये जागा नसल्याने त्यांनाच ऑटोचा खर्च करावा लागतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने या मार्गावरील सकाळच्या फेरीची गर्दी तातडीने लक्षात घेऊन अतिरिक्त बस सुरू करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.