अंचरवाडी भरोसा रस्त्यावरील नदीवर पुलच नाही! मशागतीसाठी शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास ;जिल्हा प्रशासनाने तातडीने पुल बांधण्याची मागणी!
पुलाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान! जनावरांना चारा पाण्यापासून राहावे लागते वंचित...
Aug 25, 2025, 20:10 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंचरवाडी भरोसा मार्गावरील सावित्री नदीवर पुल नसल्याने शेतकऱ्यांना जीव धाेक्यात टाकून नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. या नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देवून करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात चार ते पाच महिने शेतकऱ्यांना शेतातच जाता येत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच पुर असल्यास शेतकऱ्यांना गुरांना चारा पाणी देणेही शक्य हाेत नाही. शेतकऱ्यांच्या या गंभीर व्यथेकडे प्रशासनाने लक्ष देवून तातडीने पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
चिखली तालुक्यातील अंचरवाडी भरोसा रस्त्यावरून जाणारा गावजोड रस्ता सध्या कच्चा असून तो थेट नदीपात्रातून जातो. त्यामुळे मुसळधार पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची कपाशी शेती तसेच दुग्धव्यवसाय यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही वेळा चार-पाच दिवस शेतात जाऊन दूध काढणेही शक्य होत नाही. नदीला पुर आल्यास शेतकऱ्यांची माेठी कसरत हाेते. या रस्त्याबाबत याआधीही अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. "रस्ता नसल्याने आमच्याकडे शेती असूनही नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पुलाचे काम हाती घ्यावे," अशी मागणी करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा
चिखली तालुक्यात गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. ऑगस्ट महिन्यात दाेन वेळा झालेल्या अतिवृष्टीने नदी नाल्यांना पूर आला हाेता. अंचरवाडी येथील सावत्रा नदीलाही माेठा पुर आला हाेता. त्यावेळी चार ते पाच दिवस शेतकऱ्यांना शेतात जाता आले नाही. पावसाळ्यात दरवर्षीच ही समस्या असल्याने त्यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे...