मासरूळात शंकरपटाचा थरार; ‘मायकल–राणा’ जोडी ठरली सर्वात वेगवान! शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ – जालिंदर बुधवत...
यावेळी बोलताना जालिंदर बुधवत म्हणाले की, बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नसून शेतकऱ्यांचा पारंपरिक वारसा आणि आवडता छंद आहे. सध्या या शर्यतींमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढत असून बैलांचे संगोपन, निगा राखणे ही जबाबदारी तरुणाई स्वतः घेत आहे. परिणामी बैलांच्या किमतींमध्येही मोठी वाढ होत आहे. शेतीमातीशी एकनिष्ठ असलेल्या बांधवांसाठी हा खेळ अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमात शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर तसेच प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कल्पक आयोजनामुळे गेल्या तीन दिवसांपासून मासरूळ येथे शंकरपटाचा थरार रंगला होता. पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी बांधव आणि विशेषतः तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला.
अखेरच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत साधारण (जनरल) गटात मेहकर येथील पैलवान ग्रुपची ‘रॉकी–भीमा’ जोडी (५.४६ सेकंद) प्रथम आली. तर ‘ड’ गटात मनोज चव्हाण (रा. करोडी) यांची ‘मायकल–राणा’ ही जोडी (५.३८ सेकंद) सर्वात वेगवान ठरली.
या शंकरपट स्पर्धेत सुमारे पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची लूट झाली. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
विजेते साधारण गट :
प्रथम – गणेश भराड पैलवान ग्रुप (मेहकर) व प्रशांत मोरे (गुम्मी) यांची रॉकी–भीमा जोडी
द्वितीय – राजू चव्हाण (लक्ष्मण नगर) व चरणभाऊ यांची विराट–साई जोडी
तृतीय – पैलवान ग्रुप (मेहकर) व कैलास राठोड (कानफोडी) यांची चिमण्या–मयूर जोडी
‘ड’ गट :
प्रथम – मनोहर चव्हाण (करोडी) व सोनू भवटे (बदनापूर) यांची मायकल–राणा जोडी
द्वितीय – विशाल कवाळ (कवाळवाडी) व प्रथमेश तायडे (नांद्रा कोळी) यांची साई–विराट जोडी
तृतीय – योगेश गव्हाड (तळेगाव) व आशिष काळे (साखरखेर्डा) यांची बादल–पवन जोडी