शालार्थ आयडी घाेटाळ्यानंतर शिक्षक विभाग अॅक्शन माेडवर; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश..!
याबाबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, प्राथमिक वेतन पथक अधीक्षक पंकज गवई, सुभाष थोंबाळे तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सन २०१२ पासूनचे नियुक्त्यांची पडताळणी हाेणार
शिक्षणाधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या कालावधीतले वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, संस्थेचे नियुक्ती आदेश आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात १३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार शाळांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. अद्याप तीन शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याने त्यांनी ते तातडीने बसवावेत, असेही निर्देश देण्यात आले.
बिंदु नामावली अद्ययावत करण्याचे आदेश
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती 1981 अधिनियम, बिंदू नामावलीची प्रमाणितीकरण प्रक्रिया, तसेच शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करण्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 20 ऑगस्टपर्यंत सर्व शाळांनी बिंदू नामावली विभागाकडे सादर करणे आवश्यक असून 30 ऑगस्टपर्यंत दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करून अहवाल सादर करावा लागेल. तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठीत करणे, तक्रार पेटी बसवणे, नियमित बैठकांचे आयोजन करणे या बाबींचेही पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.