पगार लाखाेंचा तरी १५०० चा माेह सुटेणा; १९९ जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडक्या बहीणचा लाभ; आता घेतलेला लाभ करावा लागेल परत; शिस्तभंगाची कारवाईही हाेणार..!
Aug 25, 2025, 14:24 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजना सुरू केली हाेती.ही याेजना लागू करताना निवडणुक समाेर आल्याने कुठलीही पडताळणी करण्यात आली नाही. त्यामुळे, अपात्र असलेल्या अनेक लाभार्थ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला आहे. आता राज्य शासनाने या याेजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्यामध्ये धक्कादायक बाबी समाेर येत आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल १ हजार १८२ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजनेचा लाभ घेतल्याचे समाेर आले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल १९९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांकडून आता शासनाने आतापर्यंत घेतलेला लाभाची रक्कम वसूल करण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हाेणे या कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या १९९ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
जिल्ह्यातील ५१ हजार लाभार्थी महिला रडारवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजना जाहीर करण्यात आल्यानंतर या याेजनेसाठी पात्रता आणि अटी जाहीर करण्यात आल्या हाेत्या. मात्र, तरीही अनेक महिलांनी अपात्र असताना या याेजनेसाठी अर्ज केला तसेच आतापर्यंत लाभही घेतला आहे. आता राज्य शासनाकडून पडताळणी करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील ५१ हजार लाभार्थी महिला रडारवर आहेत. या महिलांची प्रशासनाकडून पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या १९९ महिलांचाही समावेश असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमाेद यंडाेले यांनी सांगितले. या महिला कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची वसुली करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याविषयी पत्र आल्याचेही यंडाेले यांनी सांगितले.