‘शिक्षकांची उपस्थिती बोलतेय, ही तर विजयाची नांदी’..! सुरेश देवकरांच्या नामांकनासाठी पाचही जिल्ह्यांतून शिक्षकांचा एल्गार; अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड उत्साह..
पाच जिल्हे... एकच आवाज; ‘सुरेश देवकर सर, तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है!’
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात शिक्षकांच्या उपस्थितीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘सुरेश देवकर सर, तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने भूमिका घेणारी संघटना म्हणून ‘शिक्षक भारती’ची ओळख असल्याचे सांगत, प्रा. सुरेश देवकर यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.देवकरांच्या उमेदवारीकडे केवळ एका उमेदवाराचा नामांकन अर्ज म्हणून नव्हे, तर शिक्षकांच्या प्रश्नांभोवती उभ्या राहणाऱ्या संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
‘सभ्य-सुसंस्कृत चेहरा’ म्हणून शिक्षकांकडून कौतुक
शिक्षक मतदारसंघाला शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारा प्रतिनिधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थित शिक्षकांनी सुरेश देवकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांपेक्षा सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका शिक्षक भारतीने घेतल्याचे देवकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.त्यामुळे देवकरांच्या नामांकनासाठी पाचही जिल्ह्यांतून झालेली शिक्षकांची उपस्थिती ही त्यांच्या समर्थकांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
गर्दीने वाढवला राजकीय चर्चेचा रंग!
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा विविध राजकीय आणि शिक्षक संघटनांचे उमेदवार मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे. निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू असून नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ आहे; त्यानंतर ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मतदान २३ ऑक्टोबरला होणार आहे.या पार्श्वभूमीवर नामांकनाच्या दिवशीच पाचही जिल्ह्यांतून शिक्षकांची झालेली उपस्थिती ही देवकरांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाची दृश्य ठरली आहे.
‘हीच उपस्थिती म्हणजे शिक्षकांच्या मनातील भावना आहे’, असा आशावाद देवकर समर्थकांकडून व्यक्त होत असून, ‘आजची गर्दी ही विजयाची नांदी ठरेल का?’ याकडे आता संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे. नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर अमरावतीतील शिक्षक बांधवांकडूनही देवकरांचे स्वागत केले जाणार असल्याने, आजचा दिवस शिक्षक भारतीसाठी शक्तिप्रदर्शनाचा ठरण्याची चिन्हे आहेत.