बिबट्या आला रे आला; येवता शिवारात शेतकऱ्यावर हल्ला, परिसरात दहशत!
Dec 18, 2025, 19:31 IST
चिखली (ऋषी भोपळे :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील येवता शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील दिगंबर गोविंद घेवंदे हे शेतकरी शेतात कामासाठी गेले असता अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दिगंबर घेवंदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
घटनेनंतर येवता गावासह परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून रात्रीच्या वेळी विशेष भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच नागरिकांनी सावध राहावे, एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि बिबट्याचा वावर आढळल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.