मोताळ्यात निवडणूक रणशिंग फुंकले; ५२ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यात जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ५२ ग्रामपंचायतींसाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
तहसीलदार, मोताळा यांनी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. प्रशासनाने पारदर्शक व वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक निश्चित केले आहे.

प्रभाग रचनेचे प्रमुख टप्पे

• २० फेब्रुवारी २०२६ : ‘गुगल अर्थ’ नकाशांवर आधारित गावनिहाय सीमांकन अंतिम करणे.

• २७ फेब्रुवारी २०२६ : तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त स्थळ पाहणी.

• ५ मार्च २०२६ : तहसीलदार, गटविकास अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रारूप तपासणी.

• ११ ते २३ मार्च २०२६ : जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर व राज्य निवडणूक आयोगाची मान्यता.

• ३० मार्च २०२६ : समितीकडून दुरुस्तीसह प्रारूप मंजुरी.

एप्रिलमध्ये हरकती व सूचना

• ७ एप्रिल २०२६ : प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध.

• १३ एप्रिल २०२६ : हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम मुदत.

• २१ एप्रिल २०२६ : हरकतींवरील सुनावणी.

• २८ एप्रिल २०२६ : अंतिम प्रभाग निश्चिती.

• ४ मे २०२६ : अधिकृत अंतिम प्रसिद्धी.

या कार्यक्रमात आडविहीर, वरुड, शेलापूर, माकोडी, सावरगाव जहाँगीर, सारोळा मारोती, पिंपळगाव देवी, रोहिणखेड, जयपूर, परडा, अंत्री, तपोवन, उबाळखेड, खामखेड, मोहेगाव यांसह एकूण ५२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामस्तरावरील सूचना फलक व स्थानिक माध्यमांतून माहिती देण्यात येणार असून, नागरिकांनी नकाशे व सीमांची बारकाईने पाहणी करून हरकती विहित मुदतीत सादर कराव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रभाग रचनेमुळे गावपातळीवरील सत्तासमीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.