कृषी विभागाने लाज सोडली! आंबा बागेसाठी १४ लाखांचा खर्च, उंबरठे झिजवूनही अनुदान नाही! इसरुळच्या शेतकऱ्याने बागेवर फिरवला नांगर ...

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी हा सरकारच्या धोरणांचा केंद्रबिंदू असल्याच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील इसरूळ येथे समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत फळबाग लागवडीचे अनुदान मिळावे म्हणून वारंवार अर्ज, पाठपुरावा आणि थेट आत्महत्येचा इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने हताश शेतकऱ्याने पाच एकरांवरील आंबा बागेवर नांगर फिरवला. हा प्रकार म्हणजे कृषी विभाग आणि सत्ताधाऱ्यांच्या संवेदनहीनतेचा जिवंत पुरावा असल्याची  चर्चा सुरू आहे.
कृषी विभागाच्या फलोत्पादन विकास योजनेंतर्गत इसरूळ येथील शेतकरी श्यामसुंदर भुतेकर यांनी पत्नी संध्या भुतेकर व वहिनी यमुना विठ्ठल भुतेकर यांच्या नावे दोन वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्रावर ४,५०० केशर आंबा रोपे लावली होती. शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवत त्यांनी स्वतःच्या खिशातून तसेच कर्ज काढून १४ ते १५ लाख रुपये खर्च केले. मात्र अपेक्षित अनुदान तर मिळालेच नाही, उलट दोन वर्षांचे उत्पादनही हातचे गेले.

प्रशासनाकडे तक्रार, उत्तर मात्र उशिरा

अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही काहीच परिणाम न झाल्याने अखेर भुतेकर यांनी पत्नीच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही तब्बल १५ दिवसांनी कृषी विभागाने लेखी उत्तर देत केवळ कागदी प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप आहे.
उत्तरात ई-मस्टर तयार करण्यासाठी नमुना ४ अंतर्गत मागणी, आधार-लिंक असलेली बँक खाती व मजुरांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. मात्र दोन वर्षांपासून ही प्रक्रिया का पूर्ण करून घेतली गेली नाही, यावर मात्र प्रशासनाकडे उत्तर नाही.
‘तांत्रिक अडचणी’चा बाऊ  जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे..
मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की, योजना राबविताना शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कोणाची?
शेतकरी आत्महत्येचा इशारा देतो, तरीही प्रशासन जागे का होत नाही?
की ‘शेतकरी हित’ ही फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे?
मोठ्या मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट करण्याइतकी वेळ शेतकऱ्यावर येत असेल, तर हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर शासनाच्या कृषी धोरणांवरचे मोठे प्रश्नचिन्ह आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप असून शेतकरी संघटना व विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे.