पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन; शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यास होणार मदत..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाला नव्याने प्राप्त झालेल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन आज पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
शासनाकडून जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या या व्हॅनमुळे गुन्ह्यांच्या घटनास्थळी तात्काळ पोहोचून शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यास मदत होणार आहे. या व्हॅनवर ८ प्रशिक्षित कर्मचारी २४ तास कर्तव्यावर तैनात राहणार असून, गंभीर, दखलपात्र, क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्यांतील पुरावे हस्तगत करण्यात या यंत्रणेचा मोठा उपयोग होईल. यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळून दोषसिद्धीत निश्चित वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमावेळी मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि. सुनील अंबूलकर, प्रभारी पोउपअधि. (मुख्यालय)  बाळकृष्ण पावरा, पोनि.  रवि राठोड (पोस्टे बुलढाणा शहर), पोनि. गजानन कांबळे (पोस्टे बुलढाणा ग्रामीण), राखीव पोलीस निरीक्षक  विकास तिडके (पोमु बुलढाणा), सपोनि.  दिपक ढोमणे (वाचक पोअ. बुलढाणा), पोउपनि.  प्रताप बाजड (स्थागुशा), पोउपनि.  निजाम तांबोळी (नि.क. बुलढाणा) तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनवरील कर्मचारी, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.