सामान्य रुग्णालयात अचानक ‘फायर अलर्ट’! डॉक्टरांपासून सुरक्षारक्षकांपर्यंत सगळे मैदानात; आगीचा धोका लक्षात घेऊन बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तयारी! पाहा नेमकं काय केलं...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अमरावती येथे नवजात शिशूंच्या कक्षाला अचानक आग लागल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज २ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता ‘फायर मॉक ड्रिल’ घेण्यात आली. आगीसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता तातडीने आणि सुरक्षितपणे परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आले.

विशेषतः अग्निशामक उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा, आग लागल्यानंतर रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, याबाबत डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

फायर सिस्टीमचे इंजिनियर निखिल आणि त्यांच्या तंत्रज्ञांच्या टीमने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करत अग्निशामक उपकरणांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ. भागवत भुसारी, आरएमओ डॉ. सराफ, तसेच एसएनसीयू विभागाच्या डॉ. नांगरे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाचे उपअभियंता गोपाळ भोयर, देवानंद ताठे, विजय गाडेकर तसेच एएमसी कर्मचारी अजय जाधव, उमेश जाधव आणि विजय चव्हाण यांनीही या मॉक ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अचानक आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अशा वेळी रुग्णांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करायची, आपत्कालीन परिस्थितीत वेगाने आणि सुरक्षितपणे बाहेर कसे पडायचे, तसेच उपलब्ध अग्निशमन यंत्रणेचा प्रभावी वापर कसा करायचा, याचा प्रत्यक्ष सराव या मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आला.