मलकापुर ते आव्हा बसफेरीसाठी विद्यार्थी आक्रमक; थेट बसच राेखली; बसफेरी नसल्याने विद्यार्थ्यांचे हाेतेय शैक्षणिक नुकसान; बस फेरी सुरू करण्याच्या दिल्या घाेषणा !

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागात अद्यापही बस फेरी सुरू करण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसरत करावी लागत आहे. माेताळा तालुक्यातील आव्हा येथे बस फेरी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. वारंवार मागणी करूनही मलकापूर ते आव्हा बस फेरी सुरू न करण्यात आल्याने अखेर विद्यार्थ्यांनी युवासेना उप जिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, माजी जि.प.सदस्य महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात १७ सप्टेंबर राेजी आव्हा येथे बसच राेखली. तसेच यावेळी सुरु करा, सुरु करा, मलकापुर आव्हा बस सुरु करा अशा  घोषणा दिल्या.  
मलकापुर ते पिंपळगाव देवी रोडवर असलेल्या आव्हा गावातील अनेक विद्यार्थी हे मलकापुर,दुधलगाव या ठिकाणी शाळा कॅालेज मध्ये शिक्षणासाठी जातात. त्यांना शाळेतील वेळेत कोल्ही गवळी, पि.देवी बस येत असते.  मात्र ही बस तेथूनच विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी भरुन येते. सकाळची वेळ ही बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची पण असते.मलकापुर बाजार पेठ आहे. त्यामुळे आव्हा येथील विद्यार्थी व प्रवासी त्या बस मध्ये बसु शकत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत जाता येत नाही.  त्यामुळे त्यांचे मोठ्याप्रमाणात शैक्षणीक नुकसान होते.वारंवार मागणी करूनही बस फेरी सुरू न केल्याने अखेर विद्यार्थी आणि पालकांनी १७ सप्टेंबर राेजी बस राेकाे आंदाेलन केले. यावेळी सकाळी दरराेज सकाळी ९.३० वाजता  मलकापुर ते आव्हा स्पेशल बस सुरु करा अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेना उप जिल्हाप्रमुख शुभम घोंगटे यांनी दिला. त्यावेळी माजी जि.प.सदस्य महेंद्र गवई, अजाबराव पाटील,निलेश पाटील, सुदाम पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.