जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पाचे अनावरण; केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे छत्रपतींचे आचार-विचार अंगीकारण्याचे आवाहन...
Updated: Feb 19, 2026, 19:43 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार व गुण अंगीकारून विकसित भारताच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत राजपूत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. आशुतोष गुप्ता, माजी सभापती दिलीप जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. पाळणा गीत सादर करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सवात सहभाग नोंदविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शिवपोवाडा, माऊली गीत आणि आदिवासी गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्यास दोन छत्रपती दिल्याचे नमूद केले. जात-पात मिटविण्याचे कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी केल्याचे सांगून त्यांनी दोघांनाही अभिवादन केले.