सिंदखेड राजात रातोरात बसवला शिवरायांचा पुतळा!; परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ८ जानेवारीच्या रात्रीतून बसविण्यात आला. ही बाब काल, ९ जानेवारीला सकाळी समोर आल्यानंतर पुतळा कुणी बसवला याबद्दल चर्चा सुरू झाली. या पुतळ्याची विधिवत पूजा माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. रामप्रसाद शेळके, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुतळा परवानगी न घेता रातोरात बसविल्याने नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवकांची बैठक बोलावून त्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस निरिक्षक केशव वाघ, सहायक पोलीस निरिक्षक मधुसूदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रकाश मुंढे करत आहेत.