Special Interview : शौर्यपदकप्राप्त वीर जवान रमेश बाहेकर बुलडाणा लाइव्ह कार्यालयात! ही बातमी वाचून तुमच्याही अंगावर येतील शहारे!!; म्‍हणाले, शिवरायांच्‍या प्रेरणेमुळेच माझ्याकडून झाले हे शक्य…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ जून २००१ हा दिवस… सकाळी ६ वाजेपासून जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार सुरू होता. २०-२५ दहशतवाद्यांचा सामना करण्याची जबाबदारी बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा गावचे सुपूत्र रमेश चंद्रभान बाहेकर यांच्यावर येऊन पडली होती. कारण त्यांच्या टीमपासून बऱ्याच दूर अंतरावर ते आणि त्यांचा कमी अनुभव असलेला सहकारी असे दोघेच अडकले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ जून २००१ हा दिवस… सकाळी ६ वाजेपासून जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार सुरू होता. २०-२५ दहशतवाद्यांचा सामना करण्याची जबाबदारी बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा गावचे सुपूत्र रमेश चंद्रभान बाहेकर यांच्यावर येऊन पडली होती. कारण त्यांच्या टीमपासून बऱ्याच दूर अंतरावर ते आणि त्यांचा कमी अनुभव असलेला सहकारी असे दोघेच अडकले होते. ८ गोळ्या त्यांना लागलेल्या असताना १२ तास त्यांनी दहशतवाद्यांशी झुंज देत ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पराक्रमाबद्दल २६ जानेवारी २००२ रोजी त्यांना तत्कालिन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले. २ ऑक्टोबरला बुलडाणा लाइव्हच्या थेट भेट कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या लष्करी सेवेतील चित्तथरारक अनुभव कथन केले. यावेळी लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी श्री. बाहेकर यांची मुलाखत घेतली.

श्री. बाहेकर म्हणाले, की दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी २ जून २००१ रोजी २७ मराठा राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी ऑपरेशन तलाश व विध्वंस सुरू केले होते. ४ जूनला पहाडी भागात शोध घेत असताना त्यांच्या टीमवर दहशवाद्यांनी चोहूबाजूंनी हल्ला केला. मात्र चोख प्रत्युत्तर दिल्याने आतंकवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर श्री. बाहेकर यांच्‍या टीमने गंगाचोटी या भागात शोध मोहीम सुरू केली. २ तारखेला सोबत घेतलेले अन्‍न-पाणी या काळात संपत आले होते. ५ जूनच्या पहाटे दहशतवाद्यांचे एक दल श्री. बाहेकर यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी वायरलेसवरून सिनिअर अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी मार्च करण्याचा आदेश दिल्यानंतर श्री. बाहेकर आणि त्यांचे दुसरे सहकारी दिलबार सिंग हे समोर गेले. मात्र मागे असलेल्या टीमला याबद्दल माहीतच नव्हते. घनदाट बर्फाच्छादित जंगलातून श्री. बाहेकर आणि दिलबार सिंग दहशतवाद्यांचा माग काढत होते. समोरील भागात दहशतवाद्यांनी वाकी टॉकीचे सिग्नल जाम केले होते. त्यामुळे मागील टिमशी संपर्क साधता येत नव्हता. त्यानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला.

२ तारखेपासून ऑपरेशन सुरू असल्याने श्री. बाहेकर यांच्याकडील अन्‍न-पाणी सर्वच संपले होते. नाल्यातील पाणी पिऊन श्री. बाहेकर आणि त्यांच्यामागे असलेले दिलबार सिंग आतंकवाद्यांचा सामना करत होते. मात्र कमांडो ट्रेनिंगचा अभ्यास असल्याने स्वतःजवळील दारूगोळा न संपू देता बाहेकर सामना करत होते. नाल्याच्या पलीकडील तिरावरून डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दुष्मनांना श्री. बाहेकर यांनी कंठस्नान घातले. त्यानंतर नाला ओलांडत असताना नाल्यात लपलेल्या दोन दहशतवाद्यांनी श्री. बाहेकर यांचे शस्‍त्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु कमरेला लावलेला हँड ग्रेनेड काढून श्री. बाहेकर यांनी दहशतवाद्यांवर फेकला. यात दोन दहशतवादी ठार केले. त्याच वेळी त्यांचा डाव्या बाजूने लपून असलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. श्री. बाहेकर यांच्या डाव्या कानाला गोळ्या लागल्या. चेहरा पूर्ण छिन्नविछिन्न झाला होता. चेहऱ्यांवर मांस राहिले नव्हते अशाही अवस्थेत त्यांनी पाठलाग करून तीन दहशतवाद्यांना कंठस्‍न्‍ाान घातले. जवळपास १२ तासांच्या या झटापटीनंतर श्री. बाहेकर यांची टीम तिथे पोहोचली. रात्रभर त्यांच्यावर जंगलातील एका झोपडीत उपचार करण्यात आले. ६ जून रोजी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ५ वर्षांत २७ ऑपरेशन झाले. सुरुवातीचे तीन महिने ते कोमात होते. आजच्या घडीला त्यांचा एक कान, एक डोळा,चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्णपणे निकामी झाला आहे. त्यात कुठल्याही संवेदना जाणवत नाहीत. २६ जानेवारी २००२ ला शौर्य पदकाने त्यांना गौरविण्यात आले. मात्र पुरस्कार स्वीकारत असताना हॉलमध्ये काय सुरू होते हे समजत नव्हते. राष्ट्रपतींनी विचारपूस केली मात्र ऐकूच येत नसल्याने ते काय बोलले हे कळले नाही, असे श्री. बाहेकर यांनी सांगितले.

शिवरायांची प्रेरणा…
शेतकरी कुटूंबात जन्मलेले श्री. बाहेकर सैन्यात जायचेच या ध्येयाने प्रेरित झाले होते. प्रचंड मेहनत घेऊन सैन्यभरतीची तयारी केली. १९९० ला शेगाव येथे भरती असताना २५ किमी पायी चालत गेल्यानंतर वाहन मिळाले. मात्र शिवरायांची प्रेरणा असल्याने कष्ट सहन करताना त्रास झाला नाही, असे बाहेकर यांनी सांगितले.

३७० कलम रद्द झाल्याने देशाचा, सैनिकांचा आणि काश्मिरी नागरिकांचाही फायदा…
३७० कलम लागू असताना काश्मीरमध्ये उग्रवाद मोठ्या प्रमाणात होता. दहशतवादी कोण आणि सामान्य नागरिक कोण हेसुद्धा कळणे कठीण होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद पोसला जात होता. स्थानिक जनतासुद्धा भारतीय सैन्याच्या विरोधात होती. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणे कठीण होते. भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती दहशतवादी आणि पाकिस्तानला सहज मिळत होती. अशा अवस्थेत गुप्तहेर म्हणून काम करण्याचा अनुभव श्री. बाहेकर यांना होता. यासाठी त्यांना स्थानिक भाषा शिकावी लागली. तेव्हा काश्मिरी हिंदू पंडितांना जगणे तिथे कठीण झाले होते. स्थानिक नेतेसुद्धा भारतविरोधी भूमिका घ्यायचे. मात्र केंद्र सरकारने ३७० रद्द केल्याने खूप मोठा बदल झाला आहे. हिंदू समाज आता तिथे गुण्यागोविंदाने जगू शकतो. उग्रवाद कमी होत आहे. भारतीय सैन्याला पुरेसे अधिकार देण्यात आले आहेत. आता तिरंगा डौलात फडकत आहे, असेही श्री. बाहेकर यांनी सांगितले. जवान आणि किसान या देशाचा प्राण आहेत. शेतीकडे आणि सैन्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरुणांनी भारतीय सैन्यात येऊन देशसेवा करावी. कुठलीही शासकीय नोकरी करण्यापूर्वी दोन वर्षे सैन्यात सेवा देण्याचा नियम बनायला हवा. गरज भासेल तेव्हा देशासाठी पुन्हा सीमेवर जाऊन शत्रूशी लढायला तयार असल्याचेही श्री. बाहेकर म्हणाले.