चिखली बाजार समितीत सोयाबीनच्या दराने गाठला ८ हजारांचा टप्पा! शेतकऱ्याच्या सोयाबीनला मिळाला उच्चांकी भाव; मात्र इतर शेतकऱ्यांच्या पदरी किती पडणार? मर्यादित आवकेमुळे दरातील तेजीवर प्रश्नचिन्ह...

 
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीतून काहीसा दिलासादायक समाचार समोर आला आहे. सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असतानाच चिखली बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला तब्बल ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या मार्केट यार्डात नव्या सोयाबीनला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा उच्चांकी दर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पदरी पडणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १७ नोव्हेंबर रोजी शिरपूर येथील शेतकरी गजानन विश्वनाथ शेळके यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेले चार कट्टे नवीन सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. या सोयाबीनला लिलावात तब्बल ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव मिळाला. बाजार समितीच्या आवारात मिळालेल्या या दरामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी संबंधित शेतकऱ्याचा सत्कारही करण्यात आला.

 उच्चांकी ८ हजारांचा दर; पण सरासरी भाव ७ हजारांवरच!

चिखली बाजार समितीत सोयाबीनला ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला असला, तरी सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एवढा भाव मिळत असल्याचे चित्र नाही. सोयाबीनच्या दर्जानुसार दरामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. बाजार समितीत सर्वाधिक दर बिजवाई सोयाबीनला मिळत असून, मिल क्वालिटीच्या सोयाबीनचे दर ६ हजार ५०० रुपयांपासून ७ हजार ५०० रुपयांपर्यंत आहेत. त्यानुसार सरासरी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

 सोयाबीनच्या उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांची घट!

यंदा अनियमित पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकही मर्यादित स्वरूपात होत आहे.अनेक शेतकऱ्यांना एकरी अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत अत्यल्प सोयाबीन हाती आले आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळत असला, तरी घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत उच्चांकी दराचा फायदा प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 चांगल्या दर्जाच्या सोयाबीनलाच अधिक भाव!

बाजार समितीत दाखल होणाऱ्या सोयाबीनचा दर्जा, गुणवत्ता आणि बाजारातील मागणी यानुसार दर निश्चित होत आहेत. चांगल्या दर्जाच्या बिजवाई सोयाबीनला अधिक भाव मिळत असला, तरी मिल क्वालिटीच्या सोयाबीनला तुलनेने कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दरांची माहिती घेऊनच सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत यार्डवरच सोयाबीन विक्रीस आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, उपसभापती श्रीकिसन थोंबडे आणि संचालक मंडळाने केले आहे.

 दर वाढले, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे संकट कायम!

सोयाबीनला मिळालेला ८ हजार रुपयांचा उच्चांकी दर निश्चितच दिलासादायक आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात झालेली प्रचंड घट पाहता केवळ दरवाढीवरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण दर चांगला मिळाला तरी विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा मालच शिल्लक नसेल, तर वाढलेल्या भावाचा अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे आगामी काळात सोयाबीनचे दर टिकून राहतात का आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना होतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.