साहेब..!आमच्या चिमुकल्यांना शाळेत जायला - यायला रस्त्यामुळे त्रास होतो हो..! गाव छोटं असल्यामुळे होत आहे दुर्लक्ष.?निळेगावात जाणारा मुख्य रस्ता झाला खड्डेमय...

 
खामगाव (भागवत राऊत :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :आमच्या चिमुकल्यांना खड्डेमय रस्त्यामुळे शाळेत जायला - यायला त्रास होतो आमचा तेवढा रस्ता करा. असा टाहो निळेगाव वासीय करत आहेत.
Advt. 👆

खामगाव तालुक्यात मस प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले अगदी पन्नास - शंभर घरे असलेले छोटेशे गाव निळेगाव. या गावाची लोकसंख्याही तशी दोनशेच्या आतच. खामगाव - मेहकर या मुख्य रस्त्यापासून निळेगाव सहा किलोमीटर अंतरावर आहे.या गावात जिल्हा परिषदचे शिक्षण प्राथमिक पर्यन्त आहे.त्यापुढील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना विहीगाव,रामनगर,खामगाव येथे जावे लागते.मात्र, गेल्या वर्षभरापासून गावात जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे.त्यामुळे खाजगी वाहनाने शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या चिमुकल्यांना या खड्ड्यामुळे वाहनात त्रास होतो.धक्के बसतात मात्र निळेगाव हे गाव कमी लोकसंख्या असल्याने गावात विकास कामे, रस्ते हे उशिरानेच होतात का.?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता तरी लवकरात - लवकर व्यवस्थित करा, साहेब आमच्या चिमुकल्यांना होणारा त्रास तरी कमी करा, अशी मागणी निळेगाव ग्रामस्थ करीत आहेत.