श्री संत गजानन महाराजांची पालखी संतनगरी शेगावमध्ये मोठ्या उत्साहात दाखल! चिखलीच्या देव्हडे परिवाराकडून वारकऱ्यांची आगळीवेगळी सेवा...

 
शेगाव (गणेश धुंदळे :बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) “साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या संतवचनांचा प्रत्यय देत श्री संत गजानन महाराजांची पालखी आज संतनगरी शेगावमध्ये मोठ्या भक्तिभावाने दाखल झाली. आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव ते पंढरपूर असा शिस्तबद्ध प्रवास पूर्ण करून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पालखी शेगावमध्ये पोहोचली. या सोहळ्यासाठी लाखो भाविकांसह राजकीय, सांप्रदायिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
खामगाव ते शेगाव या पारंपरिक पायीवारीमध्ये हजारो वारकरी भक्त गणगण गणात बोते…! या गजरात दिंडीसोबत चालत होते. संपूर्ण मार्गावर भक्तांसाठी ठिकठिकाणी अन्नदान, चहापाण्याची तसेच विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे चिखली येथील माजी नगराध्यक्ष श्री. रामदासभाऊ देव्हडे यांच्या कुटुंबाकडून सलग सातव्या वर्षी वारकऱ्यांची आगळीवेगळी सेवा करण्यात आली. नवोदय विद्यालयाजवळ सहभागी वारकऱ्यांचे पाय गरम पाण्याने धुऊन त्यांची सेवा केली गेली, ही या यात्रेची खास परंपरा बनली आहे.

पंढरपूरवरून परतताना शेगावमध्ये पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. अबालवृद्ध, अपंगांसह सर्व वयोगटातील भाविक भक्त या पायीवारीत सहभागी झाले होते. सायंकाळी पालखी मंदिर परिसरात दाखल होताच भक्तीमय वातावरणात संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली.श्री संत गजानन महाराजांच्या पालखी आगमनाने संतनगरी शेगाव भक्ती आणि उत्साहाने उजळून निघाली असून शहरातील वातावरण आध्यात्मिकतेने भारावून गेले आहे.