खामगावात शिवसेना (UBT) आक्रमक! डिझेल-पेट्रोल दरवाढ, NEET पेपरफुटीविरोधात तहसीलवर धडक; 'कॅनमध्ये डिझेल द्या, पीक विमा खात्यात जमा करा' नाहीतर रस्त्यावर उतरू..! 

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडरच्या गगनाला भिडलेल्या दरवाढीविरोधात आणि शेतकरी-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खामगाव तालुका व शहराच्या वतीने आज तहसील कार्यालयावर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. 'ट्रॅक्टरला कॅनमध्ये डिझेल द्या, पीक विमा तात्काळ जमा करा' अशी मागणी करत शिवसैनिकांनी तहसीलदार सुनील पाटील यांना निवेदन दिले व मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
शासनाने केलेल्या इंधन व गॅस दरवाढीमुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे वैद्यकीय NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. पेरणीच्या तोंडावर खते-बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. पीक विम्याची रक्कमही रखडली आहे. या सर्व समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या: 
तहसीलदार सुनील पाटील यांच्याशी चर्चा करून शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदर व शहर प्रमुख रवि जैन यांच्या नेतृत्वाखाली खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले:

१. दरवाढ रद्द करा: पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ त्वरित रद्द करून सर्वांना सुलभ पुरवठा व्हावा.
२.  कॅनमध्ये डिझेल द्या: शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला लागणारे डिझेल शेतकऱ्यांना कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्यांचा मनस्ताप कमी होईल.
३.  NEET दोषींवर कारवाई: वैद्यकीय NEET पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी.
४.  खते-बियाणे मुबलक द्या: पेरणीसाठी लागणाऱ्या खतांचा व बियाण्यांचा तुटवडा दूर करून शेतकऱ्यांना मुबलक साठा उपलब्ध करावा.
५.  पीक विमा ताबडतोब जमा करा: शेतकऱ्यांची रखडलेली पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात त्वरित वर्ग करावी.
६.  पंपावर साठा लिहा: पेट्रोल-डिझेल पंपावर शिल्लक साठ्याची लेखी माहिती दर्शनी भागात लावावी व गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या रांगांचे योग्य नियोजन करावे.

'नाहीतर रस्त्यावर उतरू' - शिवसेनेचा इशारा 


"शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व जनसामान्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या नाहीत, तर खामगाव तालुका शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. पंप मालक व गॅस वितरकांची बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणीही करण्यात आली.  यावेळी तालुका प्रमुख श्रीराम खेलदर, शहर प्रमुख रवि जैन, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष ठाकूर, युवा सेना तालुका प्रमुख राहुल मानमोडे, उप तालुका प्रमुख प्रकाश पवार, मोहन सिंग इंगळे, हेमंत खारोडे, विभागप्रमुख रामेश्वर लाहुडकर, शाखा प्रमुख ज्ञानदेव रोटे, सुनील नेमाडे, दीपक कांबळे, संतोष सांगळे, संदीप केव्हारे, मोतीराम गावंडे, संजय बुंदे, शुभम बावस्कार, पवन भाऊ, अजय दुतोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.