शिंदे सेनेने रणशिंग फुगले ! “महायुतीच्या विजयासाठी जीवाचे रान करा” – खा. श्रीकांत शिंदे यांचा  संदेश; मेहकरात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निर्धार, गद्दारांवर पाणीपुरवठा मंत्र्यांचा रोखठोक इशारा!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महायुतीच्या विजयासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे,” असे आवाहन शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. बुधवारी मेहकर येथील भूमिपुत्र शेतकरी भवन प्रांगणात आयोजित शिवसंकल्प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार संजय रायमुलकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अर्जुन खोतकर, संजय गायकवाड, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांसह अडीच हजार पदाधिकारी उपस्थित होते.
“ही कार्यकर्त्यांचीच निवडणूक” – श्रीकांत शिंदे

समारोप सत्रात मार्गदर्शन करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या लढाईत कार्यकर्त्यांचा विजय म्हणजेच शिवसेनेचा विजय. महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत जनहितासाठी प्रचंड कामे केली आहेत. ही कामे घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याची आहे.” त्यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, “महायुतीचे उमेदवार बहुसंख्येने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने बूथपातळीवर झटावे.”

“गद्दार ओळखा आणि त्यांना जागा दाखवा” – गुलाबराव पाटील

या वेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, “माजी आमदार संजय रायमुलकर यांचा पराभव आपल्या गोटातील गद्दारांमुळे झाला. बाहेरच्यांची ताकद नव्हती. आपल्यातलेच काही लोक विश्वासघातकी ठरले. आता अशांना ओळखून त्यांना त्यांच्या जागी बसवायचे आहे.”
त्यांच्या या वक्तव्याने शिबिरात क्षणभर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

 “खरी शिवसेना म्हणजे शिंदेसेना” – आ. मनीषा कायंदे

महिलांच्या राजकीय सहभागावर बोलताना आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’, विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षण, लखपती दीदी योजना, एसटी प्रवास सवलत अशा योजनांद्वारे शिंदे सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे.”
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, “प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या आधी आईचे नाव लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय हा शिंदे सरकारचा महिलाविषयक दृष्टिकोन दाखवतो.”
शिबिरात विश्वनाथ केळकर यांनी ‘लक्षवेध अॅप’ या पक्षाच्या डिजिटल साधनाबद्दल मार्गदर्शन केले, तर प्रतिक शर्मा यांनी “राजकारणातील सोशल मीडियाचा प्रभाव” या विषयावर सविस्तर विवेचन केले. पक्षाच्या डिजिटल संघटनात्मक तयारीवरही या सत्रात भर देण्यात आला.
संध्याकाळी संभाजीनगर येथील प्रा. राजेश सरकटे यांच्या “स्वरविहार” या संगीत कार्यक्रमाने वातावरण रंगले.
‘दिल दिया है जान भी देंगे’, ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘चिंब पावसाने रान झाले आबादानी’ यांसारख्या देशभक्तीपर आणि गोड गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, लोणारचे भगवानराव सुलताने, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, नीरज रायमुलकर, दिलीपराव देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.