‘माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता हरपला!’ नाना पाटेकरांच्या निधनाने प्रतापराव जाधव भावुक; म्हणाले, ‘अभिनयाची ताकद अन् माणुसकीची ऊब यांचा सुंदर संगम...’
नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच चित्रपटसृष्टीसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही नानांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.“पडद्यावरील भूमिकांमधून असंख्य मनांना स्पर्श करणारा आणि पडद्याबाहेरही माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आज आपल्यातून निघून गेला,” अशा शब्दांत जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘अभिनयाची ताकद अन् माणुसकीची ऊब म्हणजे नाना...’
“अभिनयाची ताकद आणि माणुसकीची ऊब यांचा सुंदर संगम म्हणजे नाना पाटेकर. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले कार्य त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देत राहील,” असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अब तक छप्पन’ ते मराठीतील ‘नटसम्राट’ अशा विविध चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहिल्या.
परखडपणा, बेधडकपणा अन् स्पष्टवक्तेपणा...
नानांचा स्पष्टवक्तेपणा, परखड भूमिका आणि बेधडक स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख ठरल्याचे जाधव यांनी नमूद केले. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या प्रदीर्घ प्रवासात नाना पाटेकर यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील असणारा कलाकार म्हणूनही स्वतःची प्रतिमा निर्माण केली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.नाना पाटेकर यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्रीसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अभिनयासोबतच शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचीही विशेष ओळख होती.
‘नाना अचानक आपल्याला सोडून गेले...’
“नाना आज अचानक आपल्याला सर्वांना सोडून निघून गेले. माणुसकीची भूमिका जगणारा संवेदनशील अभिनेता आपल्यातून निघून गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी अभिनयपर्वाचा अंत झाला असून, देशभरातील चाहते, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.