रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला विविध स्थरांतून पाठिंबा! ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिपक केदारही पोहचले आंदोलनस्थळी! गावोगावच्या सरपंचांचा तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात सहभाग..
Jun 15, 2026, 19:18 IST
बुलढाणा(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आजपासून बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. दिवसभरात गावगाड्यातील शेतकरी,शेतमजूर, महिला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पोहचत होत्या. विशेष म्हणजे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनात तरुण शेतकरी पुत्रांचा सहभागही लक्षणीय दिसत आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिपक केदार यांनीही रविकांत तुपकरांच्या आंदोलन स्थळी दाखल होत शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. अखिल भारतीय सरपंच संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच देखील तूपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यात पोहचले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे "वन टाइम सेटलमेंट योजना" असल्याचा गंभीर आरोप तुपकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नसल्याचा पवित्रा तुपकर यांनी घेतला आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या लोकनेत्याला पाठिंबा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते दाखल होत आहेत.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनस्थळी दाखल होत पाठिंबा जाहीर केला. तुपकर हे शेतकरी चळवळीतील रत्न असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केदार यांनी केले. केंद्रातले आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, या सरकारला धडा शिकवण्याची ताकद रविकांत तुपकर यांच्यात आहे.ह्या लढ्यात आम्ही सोबत आहोत असे दिपक केदार म्हणाले.