सहा महिन्यांपासून रेशन उचलले नाही; आता १५ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार! पुरवठा विभागाचा निर्णय; सरकारच्या अन्नसुरक्षा योजनांवर प्रश्नचिन्ह !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील तब्बल १५ हजारांहून अधिक रेशनकार्डधारकांनी गेल्या सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य उचलले नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने या कार्डधारकांची यादी ‘सायलेंट आरसी’ म्हणून तयार करून जिल्हास्तरावर पाठविली आहे. आता या कुटुंबांचे रेशन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सरकारकडून गाजवून सांगितल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभ मिळणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गट योजनांमध्ये मोठ्या संख्येने कुटुंबांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या ६३,७९३ अंत्योदय रेशनकार्ड असून त्यात २,६७,७०२ सदस्य लाभ घेतात. तर प्राधान्य कुटुंब गटांतर्गत ३,९७,३९४ रेशनकार्ड व १६,४९,५०९ सदस्यांची नोंद आहे. मात्र यातील ६,७५१ रेशनकार्डधारक (सदस्यसंख्या १५,९३०) यांनी सहा महिन्यांपासून धान्य उचललेले नाही.

जर कोणत्याही लाभार्थ्याने सलग सहा महिने धान्य उचलले नाही, तर त्याचे कार्ड निष्क्रिय केले जाते आणि त्याचा लाभ तात्पुरता बंद होतो. शासनाच्या नियमानुसार लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधितांनी स्थानिक कार्यालयात अर्ज करून आवश्यक कागदपत्रे दाखल करावी लागतात.त्यामुळे, आता या १५ हजार रेशनकार्ड धारकांचे धान्य बंद हाेण्याची शक्यता आहे.