राहुल बोंद्रे चिखलीत परतले; समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी, म्हणाले— “राहुलजींसोबत संघर्ष करत राहणार”! दबावाबद्दल विचारल्यावर म्हणाले,मागचा विषय......
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होती. २० सप्टेंबर रोजी बोंद्रे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याची माहितीही समोर आली होती. स्थानिक पातळीवरही या प्रवेशाची तयारी सुरू होती. मात्र, २१ सप्टेंबरच्या रात्री या संपूर्ण राजकीय घडामोडीला अचानक कलाटणी मिळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेससोबतच राहण्याची भूमिका जाहीर केली.
दिल्ली दौऱ्यानंतर चिखलीत जल्लोष
या घडामोडीनंतर राहुल बोंद्रे दिल्लीला रवाना झाले होते. दिल्ली दौऱ्यानंतर चिखलीत परतताच समर्थकांनी त्यांचे फटाके फोडून स्वागत केले. यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी करत परिसरात जल्लोष केला.
या स्वागतानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोंद्रे यांनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांच्या झालेल्या भेटी या पूर्वनियोजित आणि आधीच निश्चित झालेल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आता राहुलजींसोबत संघर्ष करत राहायचं ठरवलंय”
आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले, “आता राहुलजींसोबत संघर्ष करत राहायचं ठरवलं आहे.”
देशातील गोरगरीब जनता, शेतकरी आणि देशाच्या हितासाठी भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “राहुलजींसोबत या संघर्षात आम्ही आहोत,” असेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजप प्रवेशाच्या चर्चेदरम्यान आपल्यावर कोणता राजकीय दबाव होता का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोंद्रे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. “तो मागचा विषय आहे. त्यावर न बोलता मला पुढे जायचं आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आधीच्या विधानांमुळेही रंगली होती चर्चा
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. विशेषतः चिखलीच्या राजकारणात बोंद्रे आणि भाजपच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यातील जुना राजकीय संघर्ष लक्षात घेता, संभाव्य पक्षप्रवेशानंतर स्थानिक राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, राहुल गांधी यांच्या फोननंतर बोंद्रे यांनी निर्णय बदलल्याने या सर्व चर्चांना अचानक वेगळे वळण मिळाले. आता बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका स्पष्ट केल्याने चिखलीतील काँग्रेसची पुढील राजकीय रणनीती काय असेल आणि बोंद्रे यांची आगामी भूमिका नेमकी कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.