जमीनीच्या माेबदल्यासाठी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याने घेतली नदीपात्रात उडी; आडाेळ खुर्द गावाजवळ जलसमाधी आंदाेलन सुरू असताना घडली घटना; प्रशासनाची तारांबळ, शाेध सुरू..!

 
जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमीनीचा माेबदला देण्याच्या मागणीसाठी एका शेतकऱ्यांने चक्क पूर्णा नदीच्या पात्रातच उडी घेतल्याची घटना स्वातंत्र्यदिनी घडली. आडाेळ खुर्द येथे शेतकरी जलसमाधी आंदाेलन करीत असताना अचानक ही घटना घडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. पूर्णा नदीचे पात्र तुडूंब भरलेले असल्याने या शेतकऱ्यांचा शाेध प्रशासनाने सरुू केले आहे. विनाेद पवार असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
जळगाव जामाेद तालुक्यात गत काही वर्षांपासून जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे.या प्रकल्पात जमीन गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून माेबादला मिळालेला नाही. त्यामुळे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माेबादला देण्याची मागणी केली हाेती. तसेच मागणी मान्य न झाल्यास स्वातंत्र्य दिनी जलसमाधी आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार आडाेळ खुर्द येथील पूर्णा नदीच्या पात्रात प्रकल्पग्रस्त शेतकरी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदाेलन  करीत हाेते. यावेळी अचानक विनाेद पवार नामक शेतकऱ्याने नदीच्या पात्रात उडी घेतली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा शेतकरी वाहून गेल्याची भिती व्यक्त हाेत आहे. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले हाेते. तसेच एनडीआरफएच्या टिमलाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, या आंदाेलनामुळे जिगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.