पंतप्रधान मोदींच्या हस्ते नांदुरा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; १०.६३ कोटींच्या विकासकामांमुळे मिळाल्या आधुनिक सुविधा...
नांदुरा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, नगराध्यक्ष मंगला मोरकर, माजी आमदार विजय शिंदे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संजय सावकारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण झाल्याचे सांगितले. नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसारख्या आधुनिक सेवा, डिजिटल तिकीट व्यवस्था आणि रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर झाल्याचे त्यांनी नमूद केले. नांदुरा स्थानकाच्या पुनर्विकासामुळे परिसरातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार असून रेल्वे क्रॉसिंगसह स्थानिक प्रश्नही लवकरच मार्गी लावले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
आकाश फुंडकर यांनी सांगितले की, अमृत भारत स्टेशन योजनेत नांदुरा स्थानकाचा समावेश होण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे नांदुरा स्थानकाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात नांदुरा स्थानकावर लिफ्ट, एस्केलेटर आणि अन्य प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरा रेल्वे स्थानकात आधुनिक स्थानक इमारत, प्रशस्त आरक्षण कार्यालय, चार आरक्षण कक्ष, वातानुकूलित प्रतीक्षागृह, पुरुष, महिला व दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, नवीन प्रवेशद्वार, वाहनतळ, संरक्षक भिंत, आधुनिक प्रकाशयोजना, व्हिट्रिफाइड फरशी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, टिकाऊ फर्निचर तसेच दृष्टीहीनांसाठी मार्गदर्शक पट्ट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय फलाट क्रमांक १ वर १६० मीटर आणि फलाट क्रमांक २ वर २२४ मीटर लांबीचे नवीन छत उभारण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी अडथळामुक्त प्रवेश, कमी उंचीचे आरक्षण कक्ष, विशेष प्रसाधनगृहे, राखीव वाहनतळ आणि आधुनिक दिशादर्शक फलकांमुळे स्थानक अधिक प्रवासी-केंद्रित आणि सर्वसमावेशक बनले आहे. नव्या सुविधांमुळे नांदुरा आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.