सर्पदंशाने गर्भवतीचा दुर्दैवी अंत! रस्ता नसल्याने चादरी-बांबूची झोळी करून ४ किमी पायपीट; उपचारासाठी धावाधाव सुरू असतानाच वाटेतच मृत्यू

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला सर्पदंशानंतर चक्क बांबू-चादरीची झोळी करून खडतर वाटेवरून सुमारे चार किलोमीटर पायी रुग्णालय गाठावे लागले. उपचारासाठी नातेवाईक आणि गावातील तरुणांची धडपड सुरू असतानाच वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटपरी येथे घडली.

सादुरी राधेश्याम खरात (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती अडीच ते तीन महिन्यांची गर्भवती होती. २५ ऑगस्ट रोजी दुपारी तिला विषारी सापाने दंश केला. सर्पदंशानंतर तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. त्यामुळे नातेवाईकांसह गावातील तरुणांनी वेळ न दवडता बांबू आणि चादरीच्या मदतीने झोळी तयार केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची धडपड सुरू केली.

रस्ता नसल्याने चार किलोमीटरची खडतर पायपीट!

चाळीसटपरी परिसरात रस्ता नसल्याने रुग्णवाहिकेसह वाहन घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलेला झोळीच्या सहाय्याने पायीच नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली. त्यातच पावसामुळे वाट निसरडी झाली होती. जीव वाचवण्यासाठी गावातील तरुण आणि नातेवाईकांनी मोठी कसरत करत सुमारे चार किलोमीटरचे अंतर पायी पार केले.अखेर महिलेला भिंगारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथून तिला जळगाव जामोद येथे हलविण्यात आले. उपचारासाठी आणखी वेळ गेला.

उपचारासाठी रुग्णालयांच्या फेऱ्या; खामगाव, त्यानंतर अकोल्याचा सल्ला

जळगाव जामोद येथे पोहोचल्यानंतरही सर्पदंशावरील आवश्यक उपचार उपलब्ध नसल्याने महिलेला खामगाव येथे नेण्यास सांगण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा तिच्या उपचारासाठी प्रवास सुरू झाला.खामगाव येथे पोहोचण्यापूर्वीच तिची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने तिला अकोला येथे रेफर करण्याचा सल्ला मिळाल्याची माहिती आहे. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावपळ सुरू असताना नातेवाईक तिचा जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. मात्र, अखेर वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्ता, उपचार आणि सुविधांचा अभाव पुन्हा ऐरणीवर

या घटनेने दुर्गम भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना रस्ता नसल्यामुळे रुग्णाला झोळी करून चार किलोमीटर पायी न्यावे लागणे आणि त्यानंतर उपचारासाठी विविध ठिकाणी धावपळ करावी लागणे, ही परिस्थिती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.सादुरी खरात यांच्या मृत्यूने चाळीसटपरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दुर्गम भागातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा आणि रस्त्याची सुविधा कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.