सणासुदीत निकृष्ट ज्वारीचा घोटाळा? वितरण तात्काळ थांबवा; दुकानदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ऐन सणासुदीच्या तोंडावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटपासाठी ढकलली जात असल्याचा गंभीर आरोप स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केला आहे. बुलढाणा व मोताळा तालुक्यातील दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत मार्च महिन्यातील ज्वारी वितरण तात्काळ स्थगित करण्याची ठाम मागणी केली आहे.विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या निवेदनानंतरही हीच ज्वारी वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील गोर गरीबांना सण उत्सव या ज्वारीवरच साजरे करावे लागणार आहेत. 

२० फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत योजनेत खरेदी केलेले धान्य मार्च महिन्याच्या नियतनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्याअन्वये बुलढाणा तालुक्यासाठी १८०० क्विंटल तर मोताळा तालुक्यासाठी १६०० क्विंटल ज्वारी शासकीय धान्य गोदाम, मोताळा येथून उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ही ज्वारी अत्यंत निकृष्ट अवस्थेत असून त्यात जाळे, गोळे, किडे आणि खराब अंश मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “चाळणी करूनही परिस्थिती सुधारत नाही,” असा दावा दुकानदारांनी केला आहे.
रमजान, गुढी पाडवा आणि होळी यांसारखे महत्त्वाचे सण मार्चमध्ये येत असताना लाभार्थ्यांना खराब धान्य देणे म्हणजे रोषाला आमंत्रण देणे होय, असे संघटनेचे म्हणणे आहे. “धान्य निकृष्ट असेल तर जबाबदारी आमच्यावर ढकलू नका,” असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.ज्वारीचे नमुने शासकीय प्रयोगशाळा, अमरावती येथे तपासणीसाठी पाठवून ती मानव उपभोगास योग्य असल्याचे प्रमाणित झाल्यानंतरच वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्याय म्हणून ज्वारीऐवजी मका वाटपाचा प्रस्तावही पुढे करण्यात आला आहे.प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. संघटनेने २० फेब्रुवारी रोजी हे निवेदन दिले होते. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर,जिल्हा सचिव मोहन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बरडे, शहराध्यक्ष सय्यद आसीफ (बुलढाणा) तसेच मोताळा तालुका अध्यक्ष विश्वास पाटील आदींसह इतरांची स्वाक्षरी होती. मात्र, तरीही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.