डोणगाव परिसरात निकृष्ट रेशन धान्याची साडेसाती कायम, ६० टक्के तुटलेला तांदूळ; उग्र वासाची ज्वारीचे वाटप;
रेशनमधून मिळणारा तांदूळ शिजवावा की टाकून द्यावा, असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे उभा ठाकला आहे. हा तांदूळ खाण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, ऑक्टोबर महिन्यापासून चुरी असलेला, निकृष्ट दर्जाचा तांदूळ सातत्याने वितरित केला जात आहे. यावर कहर म्हणजे डिसेंबर महिन्यात वितरणासाठी आलेली ज्वारीही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यामधून उग्र वास येत आहे.
‘फुकटात काय हिरे-मोती देणार?’ – दुकानदारांचे उत्तर
रेशन दुकानदारांकडून तक्रार केल्यावर लाभार्थ्यांना, “फुकटात काय हिरे-मोती देणार, जसा माल आला तसा घ्या” अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला निमूटपणे निकृष्ट धान्य स्वीकारावे लागत आहे. निकृष्ट धान्याचा साठा आल्यानंतरही काही दुकानदार पुरवठा विभागाला माहिती देत नसल्याचा आरोप होत असून, यामागील कारणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार
रेशनमधील निकृष्ट धान्याबाबत शैलेश सावजी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव व परिसरातील रेशन दुकानांमध्ये आलेला तांदूळ व ज्वारी खाण्यायोग्य नसून, बाजारात ज्याला ‘कॅटल फूड’ म्हणून संबोधले जाते, त्याच दर्जाचा माल शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून वाटप केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ व ज्वारी तात्काळ सर्व रेशन दुकानांतून परत घेऊन, त्याऐवजी चांगल्या व खाण्यायोग्य प्रतीचा धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
गोरगरीब जनतेसाठी असलेल्या योजनांचा उद्देश सफल व्हावा, यासाठी निकृष्ट धान्य पुरवठ्यावर तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.