देऊळगाव राजा नगर पालिकेसाठी उद्या मतदान; 29 हजार मतदार करणार नगराध्यक्षांसह 21 सदस्यांची निवड; प्रशासनाकडून तयारी पूर्ण...
Dec 19, 2025, 21:00 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : न्यायालयीन प्रक्रीयमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या देऊळगाव राजा नगर पालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण दहा प्रभागातील 21 उमेदवार तसेच नगराध्यक्षांची निवड शहरातील 29 हजार मतदार करणार आहेत. 30 बुथवर निवडणूक प्रक्रीया पार पडणार असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीवर न्यायालयाच्या एका आदेशाने विरजण पडले आणि काही कालावधीसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. परंतु वाढलेल्या कालावधीमध्ये विविध उमेदवारांची प्रचार यंत्रणा आणि राजकीय नेत्यांनी विविध प्रभागात खेळलेली खेळी ही या क्षणापर्यंत टिकलेली नसल्याने आता परत त्याच लोकांची मनधरणी राजकीय नेत्यांना करावी लागली. नगराध्यक्षपदासह विविध प्रभागात 80 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत .नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत असून दहा प्रभागातील 21 सदस्य संख्या साठी 77 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. देऊळगाव राजा येथे झालेली प्रभाग रचना ही उमेदवारासाठी नव्याने असल्याने त्याची आकडेवारी जुळवण्यात त्यांची दमछाख झाली. शहरात एकूण 29 हजार 326 मतदार असून 14,854 पुरुष तर तर स्त्री मतदारांची संख्या 14,406 आहे.
आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच प्रतिष्ठा पणाला
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका ह्या नगरपालिकेच्या निवडणूक या नांदी ठरणार असून यामध्ये आमदार मनोज कायंदे, तसेच माजी आमदार राजेंद्र शिंगणे तसेच माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची पणाला लागली आहे