जिल्ह्यातील ११ नगर पालिकांच्या राजकारणात रंगत! आजपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू”– प्रशासन सज्ज; उमेदवारांसह एकालाच कक्षात प्रवेशाची परवानगी...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय रणसंग्रामाला आता अधिकृत सुरुवात झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या अकरा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, सोमवारपासून (१० नोव्हेंबर) नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना (शिंदे-उद्धव गट) तसेच स्थानिक अपक्ष उमेदवारांमध्ये चुरस होणार असल्याचे संकेत आहेत.
राजकीय नेत्यांनी मागील काही दिवसांपासून प्रभागनिहाय प्रचार आणि गटबांधणी सुरू केल्याने शहरांमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. फक्त २४ दिवसांत उमेदवारी, छाननी, मतदान आणि मतमोजणी अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्याने प्रशासन व उमेदवार दोघांनाही वेळेचे भान राखावे लागणार आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण नामांकन दाखल करताना उमेदवारासोबत फक्त एकाच व्यक्तीस कक्षात प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मतदारसंख्या वाढल्यामुळे यंदा मतदान यंत्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त जी. एस. पेंटे यांनी दिली.
एकूण ४ लाख ७६ हजार मतदार ११ नगराध्यक्ष आणि २८६ नगरसेवकांची निवड करणार असून १४१ प्रभाग व ५३४ मतदान केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी आणि अतिरिक्त अधिकारी अशा एकूण ३३ अधिकाऱ्यांची नेमणूक आधीच करण्यात आली आहे.

 असे आहे वेळापत्रक
अर्ज स्वीकारणे: १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान (रविवार वगळता) सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत; १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
छाननी: १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून. माघार: १९ ते २१ नोव्हेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत). चिन्ह वाटप: २६ नोव्हेंबर.

मतदारांना तीन ते चार मते द्यावी लागणार

नगर परिषदेत बहुसदस्यीय पद्धती असल्याने एका प्रभागात दोन ते तीन सदस्य निवडले जातील. त्याचबरोबर थेट नगराध्यक्ष पदासाठीही मतदान असल्याने मतदाराला तीन ते चार मत देणे अपेक्षित आहे.

 अनामत रक्कम
‘अ’ वर्ग: सर्वसाधारण – ₹३,००० / राखीव व महिला – ₹१,५००

‘ब’ वर्ग: सर्वसाधारण – ₹२,००० / राखीव व महिला – ₹१,०००

‘क’ वर्ग: सर्वसाधारण – ₹१,००० / राखीव व महिला – ₹५००