तर जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांचा पीएम किसानचा लाभ हाेणार बंद! कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’अनिवार्य; पीएम किसानच्या ३.१४ लाख शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी...!
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकूण ४ लाख ३४ हजार ४६८ लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत ३ लाख १४ हजार ३०२ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. याशिवाय पीक कर्ज, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड, नैसर्गिक आपत्ती मदत, अनुदाने आदी योजनांसाठी देखील हा आयडी आवश्यक आहे. 'फार्मर रजिस्ट्री'त अचूक माहितीची नोंद शेतकरी ओळख क्रमांक अंतर्गत, शेतकऱ्यांची शेतीविषयक व वैयक्तिक माहिती आधार क्रमांकाशी संलग्न करून "फार्मर रजिस्ट्री" तयार केली जात आहे. या रजिस्ट्रीद्वारे लाभार्थ्यांची अचूक निवड करून योजनांचा लाभ अधिक पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने देता येणार आहे. यामुळे एकदा नोंदणी झाल्यावर वारंवार प्रमाणिकरणाची गरज भासणार नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख १७ हजार ५० शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. फार्मर आयडी शिवाय कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.