शेतकऱ्यांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करा; नोंदणी न केल्यास पीक विम्यासह शासकीय लाभांवर परिणाम! बुलडाणा जिल्ह्यात ‘केंद्रीय DCS MH’ ॲपद्वारे खरीप ई-पीक पाहणी सुरू;
महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार ११ ऑगस्ट २०२६ पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. ई-पीक पाहणी अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावात विशेष ‘पीक पाहणी सहाय्यक’ नियुक्त केला आहे.
८ लाख ४० हजार प्लॉटपैकी २ लाख ४० हजार प्लॉटची नोंदणी
बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख ४० हजार ९९१ मालकी हक्काच्या प्लॉटवर पीक पाहणी करायची आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ४० हजार ०६५ प्लॉटवर ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.उर्वरित प्लॉटधारक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधून ई-पीक पाहणीची नोंदणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१०० टक्के ई-पीक पाहणी आवश्यक
ई-पीक पाहणी करताना संबंधित सहाय्यकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून ‘केंद्रीय DCS MH’ ॲपद्वारे माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. या मोहिमेत १०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक आहे.खरीप हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू पड असलेल्या जमिनींचीही नोंद करणे आवश्यक आहे.
पीक विम्यासाठी ७/१२ वरील पीक नोंद महत्त्वाची
ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास ७/१२ उताऱ्यावरील ‘पीक पेरा’चा रकाना कोरा राहू शकतो. विशेष म्हणजे नंतर ही नोंद करता येत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अवेळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय विविध शासकीय अनुदाने आणि योजनांचा लाभ मिळवतानाही पीक नोंदणी महत्त्वाची ठरते.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधून १० नोव्हेंबरपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.