ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा दीड लाख शेतकऱ्यांना फटका; १ हजार २८५ हेक्टरवरील पिके गेली खरडून; ९७ काेटी ५२ लाखांची प्रशासनाने केली मागणी..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने १ लाख ५६ हजार ६२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच १ हजार २८५ हेक्टवरील पिके वाहून खरडून गेली आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून ९७ काेटी ५२ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.  
अतिवृष्टीमुळे शेतीपिके, फळपिके, तसेच जमीन वाहून जाणे आणि खरडून जाणे अशा स्वरूपाचे नुकसान बुलढाणा, चिखली, मोताळा, शेगाव, मेहकर, लोणार, देऊळगावराजा व सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये झाले. या सर्व तालुक्यांचे संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
शासनाच्या नियमांनुसार २ हेक्टरच्या मर्यादेत जिरायत पिकांसाठी ८५०० रुपये, बागायत पिकांसाठी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये या दराने नुकसानभरपाई देण्याचे निकष आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कृषी क्षेत्रावर सातत्याने नैसर्गिक आपत्ती कोसळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.