ना होर्डिंग, ना बॅनर, ना पुष्पहार...! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस यंदा दुष्काळग्रस्तांच्या सेवेसाठी समर्पित;
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या नावाखाली अनावश्यक खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे. शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी होर्डिंग, डिजिटल बॅनर, पुष्पहार तसेच स्वागत-सत्कारावर खर्च करण्याऐवजी गरजू शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, गरजू नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना शक्य ती मदत करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, सेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे १९ नोव्हेंबरपासून संगीतमय रामायण कथेला सुरुवात झाली आहे. रामरावजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून रामायण कथेचे निरूपण होत असून, या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जाणार आहे. या सप्ताहातील कार्यक्रमांमध्ये शाल, पुष्पगुच्छ स्वीकारण्याऐवजी दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी संकलित करण्यावर भर राहणार आहे. एकीकडे आध्यात्मिक विचारांचा जागर, तर दुसरीकडे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी मदतीचा हात, असे या उपक्रमाचे स्वरूप असणार आहे.
‘माझ्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग, बॅनर लावून किंवा पुष्पहार देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यापेक्षा संकटात असलेल्या शेतकऱ्याला मदत करा. गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणे, हीच माझ्यासाठी खरी शुभेच्छा ठरेल,’ अशी भावना प्रतापराव जाधव यांच्या आवाहनातून व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न राहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देणारा आणि सामाजिक सेवेला प्राधान्य देणारा ठरणार आहे.