'ना प्रवासाचा खर्च, ना पेट्रोलची धावपळ'! बुलढाणा प्रशासनाने मोदींचा 'इंधन वाचवा' मंत्र जपला; ईदपूर्व शांतता समितीची बैठक झाली १००% डिजिटल..!

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  "पेट्रोल-डिझेल वाचवा, देश वाचवा" या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला बुलढाणा जिल्हा प्रशासनाने तंतोतंत प्रतिसाद दिला आहे. आज २६ मे रोजी ईद-उल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी होणारी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक यंदा एकही लिटर इंधन न जाळता 'ऑनलाईन' पार पडली.
व्हिडिओ कॉन्फरन्सने जोडला संपूर्ण जिल्हा

दरवर्षी या बैठकीसाठी तालुका-तालुक्यातून शेकडो पदाधिकारी, पोलीस अधिकारी व सर्वधर्मीय नेते जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावत. यात वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होत असे. यंदा मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकाच व्यासपीठावर आला. तहसीलदार, पोलीस निरीक्षक ते गावपातळीवरील शांतता समिती सदस्य... सर्वांनी घरबसल्या बैठकीत सहभाग नोंदवला.

डिजिटल बंदोबस्त'चा रोडमॅप ठरला
बैठकीत पोलीस अधीक्षकांनी ईद सणासाठीचा 'ॲक्शन प्लॅन' मांडला. संवेदनशील भागात ड्रोनद्वारे नजर, सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल ॲक्टिव्ह, ईदगाह मैदानावर CCTV आणि वाहतुकीत बदल याबाबत सविस्तर चर्चा झाली. "अफवा पसरवणाऱ्याची गय केली जाणार नाही, थेट डिजिटल अरेस्ट करू," असा सज्जड दम यावेळी देण्यात आला.

प्रशासनाच्या या 'इको-फ्रेंडली' निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. एका बैठकीतून हजारो लिटर इंधनाची बचत, कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर झाला आहे. "सण शांततेत साजरे करा आणि इंधन वाचवून देशसेवा करा," असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.