एनसीएमसी कार्डाची सक्ती अन् प्रवाशांचे हाल; बुलढाणा बसस्थानकात सर्व्हर डाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तासनतास रांगेत...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या प्रवासासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' सक्तीचे केले आहे. मात्र या निर्णयामुळे बुलढाणा बसस्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नवीन कार्ड काढणे आणि रिचार्जसाठी प्रवाशांना तासनतास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' सक्तीमुळे नवीन कार्ड आणि रिचार्ज प्रवाशांनी बुलडाणा बसस्थानकात चांगलीचीच गर्दी केली आहे मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडत आहे. ग्रामीण भागातील महिला व वयोवृद्ध नागरिकांना या डिजिटल कार्डाचा वापर कसा करावा याची माहिती नसल्याने तिकीट काढताना वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. कार्ड वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक ज्येष्ठांना सवलतीऐवजी पूर्ण भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने आणि पूर्ण तिकीट काढावे लागत असल्यामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सवलत मिळण्याऐवजी उलट प्रवाशांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.