मेहकर पोलिसांची धाडसी कारवाई: गुटखा माफियाचे कंबरडे मोडले, ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मेहकर पोलिसांनी धाडसी कारवाई करत गुटखा माफियाचे कंबरडे मोडले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समृद्धी महामार्गावरून एका आयशर वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड व पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

पहाटे ४ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर- मुंबई वाहिनीवरील चॅनल क्रमांक २८२ जवळ सापळा रचून संशयित आयशर टेम्पो अडविण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पूर्णपणे भरलेला आढळून आला.

यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांना बोलावून मुद्देमालाची तपासणी करण्यात आली. तपासणीत ६५ लाख ५२ हजार रुपये किमतीचा गुटखा व १२ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण ७७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात एक आरोपी ताब्यात घेतला असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पुढील तपास मेहकर पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, पोउपनि वसंत पवार, गणेश कड, संदीप मेधने, पोलिस अमलदार श्रीकृष्ण गवई, रमेश गरड, संजय पवार, सुरेश काळे, लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शरद कापसे, करीम शहा, इब्राहीम परसुवाले, शिवाजी चिम, संदीप भोंडणे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून केली.