अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आ. मनोज कायंदेंनी दिले एक महिन्याचे वेतन; मदतीचे धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुपूर्द...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे त्यांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.

राज्यामध्ये अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त असताना संकट समयी आपणही समाजाचे काही देणं लागतं या निस्वार्थ भावनेने आपले एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधित दिला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मी आपले एक महिन्याचे वेतन संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता फंडात जमा केले असल्याचे आमदार मनोज कायंदे यांनी प्रसारमाध्यमा सोबत बोलताना सांगितले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिदृष्टी झाल्यामुळे घरे, जनावरे, शेत जमीनीसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ही परिस्थिती हृदय पिळून टाकणारी आहे. काळ्या मातीत
अहोरात्र कवाड कष्ट करणारा शेतकरी, माझा बळीराजा संकटात सापडला आहे. ही कल्पनाही मनाला बेचैन करते अशा बिकट परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे आमदार मनोज कायंदे म्हणाले. राज्यात अतिवृष्टीने थैमानघातल्याने संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी आपला एक महिन्याचे वेतन देऊन मनोज कायंदे यांनी इतर लोकप्रतिनिधी समोर एक आदर्श ठेवला आहे.