गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने मोठे नुकसान,; प्रति जनावर नुसार मदत देण्याची मागणी; शेतकऱ्यांचे प्रशासनास निवेदन!
Updated: Aug 21, 2025, 20:11 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : डोणगाव येथे १७ आणि १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये शिरल्याने जनावरांच्या चाऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेतकरी उपयोगी साहित्य देखील पुरात वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति जनावर एक ट्रॉली चारा किंवा पाच हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यापूर्वीही एक महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा पूर आला होता. त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे आणि इतर उपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. मात्र, त्या वेळी ना सर्वेक्षण करण्यात आले ना शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कळविले की, डोणगाव येथील गोठ्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला प्रती जनावर एक ट्रॉली चारा उपलब्ध करून द्यावा किंवा प्रती जनावर 5000 रुपये आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून शेतकरी या मदतीतून जनावरांसाठी चारा खरेदी करू शकतील.
यापूर्वी डोणगाव येथे आलेल्या पुरामुळे घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झालेल्या व्यक्तींना प्रती घर 5000 रुपये मदत मिळाली होती. मात्र, त्या वेळी शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे संपूर्ण नुकसान झाले असूनही त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आवश्यक मदत मिळावी यासाठी तहसीलदार, मेहकर यांना 19 ऑगस्ट रोजी उत्तमराव परमाळे, गजाननराव परमाळे, मधुकरराव धिरके, एकनाथराव परमाळे, विलासराव मानवतकर, रुपेश परमाळे, अरविंद परमाळे, भागवत पांडव, प्रकाश परमाळे, गणेश परमाळे, शंकर पवार, मंगेश फुले, सागर फुले, मयुर फुले, दर्शन फुले, सुरेश फुले, गणेश फुले, संजय फुले, वैभव परमाळे यांच्यासह 20 शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.